जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा आज वाढदिवस… नव्वदच्या दशकात जळगाव नगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत स्वकर्तृत्वाच्या जोरावर नगराध्यक्ष,आमदार, राज्याचे मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या देवकर अप्पा यांची गेल्या तीस वर्षांची वाटचाल पाहता बहूजन समाजाचे एक सामान्य, शाश्वत नेतृत्वाची हमी देणारा चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा समाजात दृढ होत आहे. अलीकडच्या बदलत्या राजकीय प्रवाहाचा विचार करता जिल्हास्तरिय नेतृत्व म्हणून बहुजन समाज त्यांच्याकडे बघत असेल, तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. अशा या संयमी व नि:गर्वी नेत्यास वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा व अभिष्टचिंतन…!
जळगावसह संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक असलेले देवकर अप्पा यांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना कोणताही कौटुंबिक राजकीय वारसा नाही. चाळीसगाव तालुक्यातील एका छोट्या खेड्यातून येऊन जळगावात आपला राजकीय ठसा उमटवणे, हे फारच विलक्षण म्हणता येईल. सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था ते विधिमंडळापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या नव्या पिढीसाठी एक वस्तुपाठ ठरावा. त्यांची कामकाजाची पध्दत लक्ष्यात घेता त्यांनी कधीही कुणाला नाउमेद केले नाही. त्यांच्या वाणी आणि व्यवहारामध्ये कधीही बडेजाव किंवा अहंकार अनुभवास आलेला नाही. अलिकडे काही राजकीय नेत्यांची भाषा, टीका टिप्पणीची प्रत खूपच खालवत चालली असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून लक्ष्यात येते. मात्र देवकर अप्पाच्या बाबतीत तसा अनुभव अद्याप तरी आलेला नाही.
नियतीने दिली पुन्हा संधी
राजकारणात चढ-उतार हे प्रसंग बहुतेक सर्वांच्या वाटेला येतात, परिस्थिती आणि प्रसंगानुरूप काही आपली भूमिकाही बदलतात. असा प्रसंग देवकर अप्पा यांच्यावरही आला. खर तर त्यांची राजकीय सुरुवात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली झाली, पण जेंव्हा दादांनी पक्षीय भूमिका बदलली, तेव्हा देवकरांनी राष्ट्रवादी कांग्रेससोबत राहणे योग्य मानून आपला मार्ग चोखाळला. सन 2009 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून ते निवडून आले, आणि राज्यमंत्री्ही झाले. आपल्या मंत्रिपदाच्या अल्पकालीन काळात त्यांनी जिल्ह्यात लक्षणीय कामगिरी केली, जळगावच्या घरकूल घोटाळ्यात अगदी किरकोळ बाबींमुळे त्यांना पदत्याग करावा लागला. या प्रकरणात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसतानाही त्याची किमत त्यांना मोजावी लागली. राजकारणातील काही बाबी हा दुर्दैवाचा परिपाठ म्हणता येईल .मात्र नियतीने त्यांना पुन्हा उभारी घेण्याची संधी जिल्हा बँकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. यातूनच कदाचित पुढील राजकीय उन्नतीचे नवे अवकाश त्यांना खुणावत आहे, हे मात्र निश्चित…
– सुरेश उज्जैनवाल
8888889014
(ज्येष्ठ पत्रकार, जळगाव)