जळगाव (प्रतिनिधी) राज्यात अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे, अशा शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर निशाणा साधला.
राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरुवात असून पुढे अजून बरीच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?” असा इशारा महाजनांनी ट्विटरवरुन दिला.
निगरगट्ट ठाकरे सरकारने पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.” असा घणाघातही गिरीश महाजन यांनी केला.
“जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे” असा इशारा महाजनांनी दिला.
















