मुंबई (वृत्तसंस्था) गेली २४ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शहरात पूर्णपणे नालेसफाई होत नाही. आजही मॅनहोलमधून लोक वाहून जात आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा दीड ते दोन हजार कोटींचा प्रकल्प असूनही ठिकठिकाणी कचरा दिसून येतो. गेली २४ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असताना शिवसेनेने फक्त सत्तेचा उपभोग घेतला. वर्षोनुवर्षे सत्तेवर असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायम आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ते दादर येथे मुंबई भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
दरेकर पुढे म्हणाले, मुंबईत मराठी शाळांची दुरवस्था होत आहे. मुंबईतील ज्या मराठी शाळा बंद पडत आहेत; ते शिवसेनेचे पाप आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा शिवसेनेला विसर पडला आहे. सत्तेसाठी शिवसेना विविध विचारधारेबरोबर गेली. हे मुंबईतील मराठी माणसालाच काय पण कडवट शिवसैनिकांनाही सहन झाले नाही. त्यामुळे मुंबईतील मराठी माणूस आता निवडणुकांची वाट पाहत आहे. जेव्हा फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतील, तेव्हा महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.