मुंबई (वृत्तसंस्था) तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन दिलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईन असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत”. देवेंद्र फडणवीस लढवय्ये आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावं, संन्यास वगैरे घेण्याची भाषा करु नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून त्यांना सांगेन तुमचं राजकीय भाषा उज्ज्वल आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या तरी किमान समान कार्यक्रमानुसार सरकार सुरु आहे. भांड्याला भांडं लागणारच, ते लागायलाही हवंच, तरच संसार टिकतो. भाजप-शिवसेना युती सरकारमध्येही भांड्याला भांडी लागत होती असं नाही तर भांडी फुटत होती, तरीही सरकार पाच वर्ष टिकलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
















