मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री रात्री बारा वाजेच्या सुमारास भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने एकाएकी फडणवीसांची भेट का घेतली?, याबाबत आता वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धनंजय मुंडे रात्री बारा वाजेच्या सुमारास गेले होते, असे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. तेथे मुंडे जवळपास अर्धा तास थांबले. दोघांमध्ये घरात कय बोलणं झालं, याविषयी काहीही माहिती समोर आलेली नाही. पण मुंडे यांच्या या भेटीमुळे शिवसेनेनंतर बंडखोरीचं वादळ राष्ट्रवादीतही सुरु होणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. विधानपरिषद निवडणुकीतही यावरून अविश्वासाचं वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतूनही बंडखोरांचा गट बाहेर पडू शकतो का?, अशा शक्यतांना विचार केला जातोय.
ठाकरे सरकारमधील मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध जगजाहीर आहे. त्यातच एकनाथ खडसे आणि फडणवीसांमधील द्वंद्वही सर्वांना माहिती आहे. एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारमध्ये विरोधी बाकांवर बसतील, अशा बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे धनंजय मुंडे यांनी वरील सर्व कनेक्शनमधून काही नवा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवला तर नाही ना, अशी चर्चा आता सुरु आहे.