धरणगाव (प्रतिनिधी) बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय (ओबीसी) पिछडावर्ग, छत्रपती क्रांती सेना, मौर्य क्रांती संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघ, यासह अन्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बंद अंतर्गत धरणगाव शहर बंद व रास्ता रोको करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व आबासाहेब राजेंद्र माळी संयोजक बहुजन क्रांती मोर्चा, तसेच अरुण पाटील तालुकाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांनी केले. तत्पूर्वी छत्रपती शिवरायांचा स्मारकाला भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश महासचिव मोहन शिंदे, शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद देवरे, राष्ट्रीय आदिवासी परिषदेचे ताराचंद भिल, शहरप्रमुख भागवत चौधरी, गोपाल पाटील, सिताराम मराठे, गौतम गजरे, नगर मोमीन आदी मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी राजेंद्र माळी यांनी म्हटले की, गृहमंत्री फडणवीसांच्या आदेशावरून मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात, महाराष्ट्र राज्याच्या ६२ हजार सरकारी शाळांचे खाजगीकरणाच्या संविधानविरोधी व बहुजनविरोधी आर.एस.एस/भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात, शिवराय – फुले- शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र वेठ बिगारांचा महाराष्ट्र करणा-या, आर.एस.एस/भाजप सरकारच्या धोरणाविरोधात, ओबीसींची जातीनिहाय जणगणना करणे व संविधानिक हक्क आधिकारांच्या समर्थनात, बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपुरचे पांडुरंगाचे मंदीर बडवे यांच्या स्वाधीन करण्याच्या आर.एस.एस/भाजपच्या षड्यंत्राच्या विरोधात, बहुजन महापुरूषांचा, संविधान व राष्ट्रप्रतिकांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीला अभय देणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात आज धरणगाव शहर बंद व रास्ता रोको करण्यात आला.
तसेच बहुजनवादी संघटनेने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून धरणगाव शहरासह पिंप्री व तालुका परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी शिवसेना (उबाठा) नेते गुलाबराव वाघ, भारत मुक्ती मोर्चाचे मोहन शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, अरविंद देवरे आदींनी सरकार संविधान विरोधी कार्य करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले. रास्ता रोकोला शहरातील विवीध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सदरील बंद व रास्ता रोको शांततेत झाला.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव मोहन शिंदे, राजेंद्र वाघ (माळी), युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष निलेश चौधरी, उबाठा शहर प्रमुख भागवत चौधरी, अरुण पाटील, कृष्णा मोरे, नगर मोमीन, नदीम काझी, गौतम गजरे आदींना रास्ता रोको आंदोलन दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेत सोडून दिले. दरम्यान, यावेळी पो.नि.उद्धव डमाळे यांच्यासह पो.हे.कॉ.मिलिंद सोनार, पोना. प्रमोद पाटील, पोकॉ.वैभव बाविस्कर, विनोद संदानशिव, नागराज साळुंखे, शामराव मोरे, राहुल बोरसे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला.