धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव महाविद्यालय लगत प्रस्तावित जागेवर क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मृतिस्थळाच्या विकासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. स्मृतिस्थळाच्या कामाला लवकर सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
नागपूर येथील विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या वेळी ग्राम विकास मंत्री नामदार गिरीश महाजन आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या जीवनपटावरील विविध बाबी उलगडणारे भव्य असे स्मृती स्मारक धरणगाव येथे उभारण्यासाठी धरणगाव महाविद्यालया लगत जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी सभागृह, यात्री निवास, वाचनालय, वस्तू संग्रहालय आदी बाबींचा समावेश असणार आहे. यासंबंधी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत पाठपुरावा होता. आज शिखर समितीद्वारे सदर आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात आली असून लवकरच या ठिकाणी स्मारकाचे काम सुरू होईल अशी माहिती नामदार गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.