धरणगाव (प्रतिनिधी) उसने दिलेले पैसे परत मागीतल्याचा रागातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना तालूक्यातील चांदसर येथे घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, कल्पेश महेश सोनवणे (वय २४, रा. चांदसर) हे २४ जून रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी कल्पेश यांनी शिवकुमार साहेबराव सोनवणे आणि घनशाम शिवकुमार सोनवणे यांच्याकडे उधार दिलेले २ हजार रुपये मागितले. पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघांनी कल्पेश सोनवणे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे कल्पेश यांचे उजव्या पायाचा गुढघा फ्रॅक्चर झाला आहे. जखमी कल्पेश सोनवणे यांचा जबाब शनीपेठ पोलीस स्टेशन कडून प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. उमेश भालेराव हे करीत आहेत.