धरणगाव प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सत्यशोधक समाज संघटनेतर्फे सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी, प्रख्यात समाजसेवक, समाजवादी विचारवंत व कामगार चळवळीचे प्रणेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांना अभिवादनपर आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्यशोधक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक करून डॉ. आढाव यांच्या समाजकार्यातील योगदानाचा वृत्तांत उपस्थितांसमोर ठेवला. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे व आदिनाथ दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी डॉ. आढाव यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
अभिवादनपर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे म्हणाले, डॉ. बाबा आढाव हे सत्यशोधकीय परंपरेचे साक्षात प्रवाही रूप होते. विचार, समाजकारण, कामगार हक्क आणि न्यायाच्या प्रश्नांवर त्यांनी आयुष्यभर ज्योतीसारखा लढा दिला. असंघटित मजूर, हमाल पंचायत, ऊसतोड मजूर, हमीकामगार यांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे ते समाजधुरंधर नेते म्हणून ओळखले जातात. “हमाल पंचायतची स्थापना हा जागतिक स्तरावर नोंदला जाणारा अद्वितीय सामाजिक प्रयोग आहे.” ते पुढे म्हणाले, “एक गाव–एक पाणवठा’’ सारख्या जातीय पाणीबंदीस विरोधातील चळवळीला त्यांनी लोकआंदोलनाचे रूप दिले. समाजवाद, समता, मानवता आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड भूमिका हेच त्यांचे जीवनमंत्र होते. लोकांचे सुख हाच माझा खरा सन्मान, हा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजेच एक जिवंत प्रेरक ग्रंथ असल्याचे डॉ. सोनवणे म्हणाले.
कार्यक्रमास ॲड. शरद माळी, ॲड. रविंद्र गजरे, प्रा. डॉ. रविंद्र मराठे, प्रा. आकाश बिवाल, माजी नगरसेवक भागवत चौधरी, बाळासाहेब जाधव, हेमंत माळी, प्रल्हाद पचेरवार, गोपाल पाटील, नंदलाल महाजन, रामचंद्र माळी, किशोर पवार, सुरज वाघरे, करीम लाला, हसन मोमीन, लक्ष्मण माळी, पप्पू कंखरे, किरण पवार, विशाल महाजन, मनोज भोई, गोरखनाथ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार धर्मराज मोरे, भगीरथ माळी, विनोद रोकडे, रविंद्र कंखरे, निलेश पवार, राजेंद्र वाघ तसेच अमळनेर येथील विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. संदीप नेरकर, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. कृष्णा संदानशिव, हेमंत पवार यांच्यासह अनेक सत्यशोधकीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून डॉ. बाबा आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. अभिवादनपर उपस्थित सर्वांनी समाजजागृती, समता आणि श्रमिक हक्कांच्या लढ्यात डॉ. बाबा आढाव यांचे योगदान चिरकाल स्मरणात ठेवण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली.












