मुंबई (वृत्तसंस्था) आम्ही संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पाठीशी आहोत, ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठवले का? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी प्रत्युत्तर दिलं. तसंच भाजपच्या अनेक नेत्यांची नावे घेत त्यांच्यावर घणाघाती आरोपही केले. संजय राऊत यांच्या या आरोपांना आता काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्याकडून भाजपवर करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडं पाडलं आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी,’ अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
‘ईडीने पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठवले का?’
संजय राऊत यांच्या आरोपांनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राऊत यांच्या पाठीशी आहोत, ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठवले का? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत, असंही पटोले म्हणाले. तसंच हे सर्व पेपर राऊत केंद्र सरकारला देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे, त्याची चौकशीही केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.