मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाजप आणि ईडीच्या कारवायांविरोधात टीका करताना दिसत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत ईडीने किरीट सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ता केले आहे का, अशी विचारणा मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिकांनी आपल्या घरी ED किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं एक सूचक ट्वीट केल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वक्फ जमीन घोटाळाप्रकरणात भाजपच्या एका नेत्यावर कारवाई होणार असल्याचे भाकितही मलिक यांनी वर्तवलं. मागील काही दिवसांपासून भाजपचा नेता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी छापामारी करत असल्याचे पत्रकारांना सांगत आहे. वक्फ प्रकरणी ईडी माझ्या घरी येणार असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. ईडीने किरीट सोमय्या ना अधिकृत प्रवक्ता केलं का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. ईडीने बोलावल्यास मी स्वत: त्यांच्या कार्यालयात जाणार आहे असे मलिक यांनी स्पष्ट केले. ईडीने अधिकृत माहिती द्यावी, मीडियात बातम्या पेरून राज्याला बदनाम करण्याचे काम बंद करावे असेही मलिक यांनी म्हटले.
नवाब मलिक यांनी वक्फ जमीन घोटाळ्याबाबतही भाष्य केले. पुणे वक्फ प्रकरणात ईडीने तपास केला. वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयात छापे टाकले. ईडीने वक्फच्या एका अधिकाऱ्याला दोन दिवस बोलावले आणि चुकीच्या पद्धतीने एफआयआर दाखल केला असल्याचे मलिक यांनी म्हटले. ‘वक्फ’च्या प्रकरणात भाजप नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे मलिक यांनी म्हटले.