जळगाव : शहरातील महानगरपालिकेच्या पंधराव्या मजल्यावरील नगररचना विभागातील दिगेश तायडे नावाच्या अधिकाऱ्याची सीआयडीमार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, नगररचना विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढून सखोल तपासले पाहिजे, अशी मागणी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान केली आहे.
महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये दिगेश तायडे नावाच्या अधिकाऱ्याविषयी जनतेत तीव्र नाराजी आहे. दिगेश तायडे याने त्याच्या पत्नीच्या नावे कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट घेतला असल्याची माहिती हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार सुरेश तथा राजूमामा भोळे यांनी दिली. याबाबत आम्ही संबंधितांकडे तक्रार केली असून चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
नगररचना विभागात बसून अनेक लेआउट रिवाईस करून आपल्या पदाचा दुरुपयोग करीत दिगेश तायडे याने कोट्यवधी रुपयांची माया जमा केली असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याची सीआयडीमार्फत निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी केली आहे. नगररचना विभागाविषयी जळगावच्या व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. या नगररचना विभागामध्ये आणखी काय काय भ्रष्टाचार झाला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी आ. राजूमामा भोळे यांनी केली आहे.