जळगाव, प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मनोरमा केशवलाल तिवारी यांना पीएच. डी. पदवी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात विद्यावाचस्पती) प्रदान करण्याचे पत्र (नोटीफिकेशन) आज प्रदान करण्यात आले. विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते श्री. तिवारी यांना याबाबत अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, मार्गदर्शक प्रा. डाॅ. सुधीर भटकर, संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव प्रविण चंदनकर, डाॅ. सोमनाथ वडनेरे, सुभाष तळेले उपस्थित होते.
कबचौउमविती आंतर विद्याशाखेत जनसंवाद व पत्रकारिता विभागामार्फत श्री. तिवारी यांनी सादर केलेल्या ८५० पानांच्या प्रदीर्घ संशोधन प्रबंधास विद्यापिठाने स्वीकृती दिली आहे. श्री. तिवारी यांचा संशोधन प्रबंधाचा विषय जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमानात नवतंत्र आणि बहुमाध्यम वापरामुळे कसे बदलले ? हे ठळक निष्कर्षांमधून समोर आणतो. संशोधन प्रबंधाचा विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ ः जळगाव जिल्हा)’ हा आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी लागवड, केळी लागवडीत नवतंत्र वापर, केळी उत्पादकांकडून माहितीसाठी बहुमाध्यम वापर, केळी उत्पादन आणि उत्पन्नात वाढ, हातात जादा पैसा आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनमान – राहणीमानात बदल अशा मुख्य विषयांचा सविस्तर अभ्यास संशोधन कार्यात केला आहे. केळी लागवड करणारा शेतकरी कोणते माध्यम वापरतो, त्यातून कोणती माहिती घेतो, माहितीचा उपयोग केळी लागवडीत कसा होतो, उत्पादन कसे वाढते, उत्पन्न वाढल्यामुळे त्याचे जीवनमान कसे उंचावते या विषयी संशोधन प्रबंधात प्रश्नावली – मुलाखती आणि विश्लेषणाचे सविस्तर प्रकरण आहे. केळी उत्पादन वाढीसाठी नवतंत्र शोध, त्याचा शेत शिवारात प्रत्यक्ष वापर, प्रचार – प्रसार या कार्यात जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे योगदान याचाही सविस्तर आढावा संशोधन प्रबंधात घेतला आहे. सरकारी कृषी गणना किंवा सामान्य जनगणना या पुढे जावून श्री. तिवारी यांनी केळी उत्पादकांच्या कौटुंबिक – सामाजिक आयुष्याचा सांख्यिकी अभ्यास संशोधन प्रबंधात सादर केला आहे. सन १९८९ नंतर जिल्हयातील केळी उत्पादकांची आर्थिक – सामाजिक स्थिती दाखवणारे हे एकमेव व्यापक संशोधन आहे.
 
	    	
 
















