भुसावळ प्रतिनिधी : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन योजनेअंतर्गत शहरातील वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य तिर्थक्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जात असून या योजनेची अंमलबजावणी अजूनही मोठ्या प्रमाणावर व्हावी, यासाठी असे धार्मिक उपक्रम नक्कीच लाभदायक ठरतील, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज केले.
शहरातील ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित “वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे” जवळपास 44 सभासद आज सकाळी श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावला रवाना झाले.यावेळी भुसावळ वाहन चालक एन. एस. कोळी ,वासुदेव जेष्ठ नागरीक संघाचे संयोजक डॉ. नितु पाटील आदी सर्व सभासद उपस्थित होते. प्रभाकर झांबरे यांच्या हस्ते श्री फळ वाढवत एसटी शेगावच्या दिशेने “गण गण गणात बोते” चा गजर करत बस रवाना करण्यात आली.
पुढे सावकारे म्हणाले की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन सेवा सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 40 प्रवासांचा गट तयार झाल्यास महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर 50 टक्के सवलत तर 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास देण्यासाठी आगार विभाग निहाय बसेस आरक्षित केले आहेत.
“स्वस्त आणि सुरक्षित”या ब्रीदवाक्यावर ही योजना आधारित असून सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देण्याचा तिचा मुख्य उद्देश आहे.अभ्यासू आणि चिकित्सक वृत्ती असल्याने डॉ. नितु पाटील जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवित असतात. यावेळी सूत्रसंचालन सतिश जंगले,प्रस्तावना डॉ. नितु पाटील आणि आभार प्रकाश पाटील यांनी मांडले.
धार्मिक सहल आणि उत्साहित जेष्ठ नागरिक.…!
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन योजनेचा लाभ घेणारे वासुदेव जेष्ठ नागरिक संघ हा भुसावळ तालुक्यातील पहिला जेष्ठ नागरिक संघ ठरला आहे.श्री गजाजन महाराज दर्शनासाठी सर्व जेष्ठ नागरीक आनंदी आणि उत्साही दिसत आहेत.
डॉ. नितू पाटील, संयोजक, वासुदेव जेष्ठ नागरीक संघ















