कोल्हापूर (वृत्तसंस्था) मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे व मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
सरकार स्थापन करताना मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना कोणाही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक लाभ करून देणार नाही, अशी शपथ घेतलेली असते. तथापि, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून देणारा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने शपथेचा भंग केला आहे. याप्रकरणी राज्याच्या अर्थखात्याने अनेक आक्षेप घेतले होते पण त्याकडे दुर्लक्ष करून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. राज्यपालांनी त्यांना शपथ दिलेली असल्याने त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. यानंतर आपण याप्रकरणी लोकायुक्तांकडे दाद मागणार आहोत तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येईल, असे राज्यपालांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल ठरले हे अपेक्षितच होते. सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करून सूर्याचे तेज रोखता येत नाही हे त्यांच्या राज्यातील टीकाकारांनी ध्यानात घ्यावे, असेही ते म्हणाले.