जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीतून भाजपची माघार ही सक्षम नेतृत्वाचा अभाव दर्शवणारी आहे. भाजपचे नेतृत्व करणाऱ्यांनीच स्वतः माघारीची घोषणा करून या संस्थेच्या निवडणुकीत परिणामकारक नेतृत्व करण्याची क्षमता नसल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केल्यासारखे आहे. तसेही ही निवडणूक काही नगरपालिका किंवा ग्रामपंचायतची निवडणूक नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यास वेगवेगळी आमिषे, किंवा दबाव अथवा थेट आत टाकण्याची भीती (संदर्भ : जळगाव मनपा निवडणूक २०१९) दाखवून भूमिकाच बदलण्यासाठी मजबूर केले जाते. तशी कोणतीही सोय, पर्याय या संस्थेच्या निवडणुकीत शक्यतो नसतो. जेडीसीसीच्या निवडणुकीसाठी आधीपासूनच नियोजन करावे लागते, शिवाय या संस्थेत पक्षीय अभिनिवेशाला फारसे महत्वही नसते. तरी देखील या संस्थेची जेंव्हा निवडणूक जाहीर झाली, तेव्हा सुरवातीला स्वबळाची भाषाही काहींनी वापरली, पण ती लवकरच हवेत विरली. त्यानंतर सर्वपक्षीय आघाडीचा खेळ सुरू झाला. तो ही एकमेकांवर कुरघोड्या, अविश्वास दाखवत सर्वपक्षीय आघाडीचा खेळही सुरू होण्यापूर्वीच आटोपला. यातील खरी लक्षणीय बाब म्हणजे सहकार क्षेत्रातील बारकावे, मुसद्दीपणा फार थोड्या जणांकडे आहे, त्यातही भाजपचे नेतृव करणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात ही गुणवैशिष्ठे कुठे आहेत? माजी मंत्री गुलाबराव देवकर, चिमणराव आबा पाटील, ऍड. वसंतराव मोरे काका, सतीश अण्णा पाटील या नेते मंडळींचा राजकीय प्रवास मुळातच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सुरू झाला.त्यांचा गेल्या २५ ते ३० वर्षांचा अभ्यास आणि सरावही आहे. भाजपबद्दल बोलायचे झाल्यास भाजपचे तत्कालीन मंत्री व विद्यमान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे अथक राजकीय परिश्रम, डावपेच आणि प्रत्येक समाजाशी असलेली बांधिलकी त्यामुळे गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपचा लक्षवेधी प्रभाव या संस्थेत उमटविला होता, तसा प्रभाव भाजपच्या आताच्या नेतृत्वाकडे कुठे आहे? भाजपने केवळ स्व:तची आब राखली.
मराठीत एक प्रचलित म्हण आहे, झाकली मूठ सव्वा लाखाची.. गिरीश महाजन यांनी ऐनवेळी माघारीची घोषणा करून स्व:तसह भाजपचीही अब राखली. कारण कोणते ही नियोजन नाही, तुल्यबळ उमेदवारांचा अभाव, अशा स्थितीत दारुण पराभवाची नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा युध्दातूनच पळ काढलेला बरा. खर तर महाजन ज्या भाजपचे नेतृत्व करीत आहेत, त्याचा इतिहास संघर्षाचा आणि सतत लढण्याचा राहिला आहे, संसदेत दोन खासदारांच्या माध्यमातून पक्ष उभा करण्याचा काळ आठवावा…! माघारी मागची जी कारणे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काल सांगितली गेली, ती फारच केविलवाणी आणि हास्यास्पद अशी होती. खर तर स्वत: श्री महाजन हे जामनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून सहज निवडले गेले असते, प्राप्त माहितीनुसार 92 मतदार संस्था पैकी 60 पेक्षा जास्त संस्था त्यांच्या बाजू ने आहेत ,असे असताना त्यांनी माघार घेणे हे एक कोडेच आहे.
गैरकारभार बाहेर काढाच …..!
जेडीसीसीमध्ये गेल्या पाच वर्षांच्या काळात मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप वजा दावा श्री महाजन यांनी केल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी छापले आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याने आता ते निवांत झाले आहेत, थोडक्यात टेन्शन फ्री आहेत. त्यामुळे त्यांनी आपली विधायक शक्ती गैरकारभार उखडून काढण्यासाठी जरूर खर्च करावी. त्यांच्या या खोदकामाचे तमाम शेतकरीच काय जिल्ह्यातील जनताही स्वागत करेल. पण ही उठाठेव करण्यापूर्वी त्यांनी गेल्या पाच वर्षात या संस्थेसाठी काय केले. तसेच ते कोणते संचालक होते, ज्यांनी आपल्या मर्जीतील संस्थाना कोट्यवधींचे कर्ज वाटले अथवा मंजूर करण्यास भाग पाडले, त्यांची नावे जाहीर करावीत. आणि हो त्या सोबतच आपण गेली पाच वर्षे संचालक पद भूषवित होता, तेव्हा ही अनागोंदी रोखण्यासाठी कोणते प्रयत्न केले, संस्थेच्या किती सभांना आपण हजर होता, अश्या कोणत्या ठरावांना तुम्ही विरोध केला, ते सभेच्या प्रोसेडिंगमध्ये नमूद असेलच…! तूर्त एवढेच…
सुरेश उज्जैनवाल
पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४