जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा पुरता फियास्कियो झाल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. परंतू नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय पॅनलच्या अंतिम बैठकीत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अनेक नेत्यांना खडेबोल सुनावत तसेच अनेकांचे कान टोचून आगामी काळात उघड राजकीय लढाई होणार असल्याचे संकेत दिले असल्याचे कळते.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, नुकतीच झालेल्या बैठकीत सर्वपक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. गिरीशभाऊ यावेळी म्हणाले की, सुरुवातीच्या दोन-तीन बैठकींना आम्ही जातीयवादी नव्हतो. मग मध्येच असं काय झालं की, आमच्याबाबत जाहीर चुकीची वक्तव्य करण्यात आली. मी कुणाकडेही सर्वपक्षीय पॅनलचा फॉम्युला घेवून गेलो नव्हतो. आमच्याकडे सर्वपक्षीय पॅनलची भूमिका मांडण्यात आली. सहकारात राजकारण नसते आणि सर्वपक्ष एकत्र येत असतील तर विनाकारण राजकारण नको म्हणून आम्ही तयारी दर्शवली. परंतू ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका बरोबर नाही. यावेळी गिरीश महाजन यांची आक्रमक भूमिका बघून अनेक नेते शांत झाले होते.
दुसरीकडे गिरीशभाऊ आक्रमक भूमिका मांडत असतांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीची नेते मंडळी नाराजी व्यक्त करत होती. अगदी भाऊ तुम्ही धमकी देत असल्याचेही अनेकांनी सांगितले. त्यावर गिरीशभाऊ म्हणाले की, सर्वपक्षीय पॅनलचा फॉरम्युला माझ्याकडे स्वतःहून आला होता. जिल्ह्याच्या हिशोबाने सर्वपक्ष एकत्र येत असतील तर उगाच वाद नको, अशी सामंजस्य भूमिका मी घेतली. पण त्यानंतरही राजकारण करण्यात आले आणि नको ते वक्तव्य करण्यात आली. यानंतर काही वेळ बैठकीत शाब्दिक चकमक झाल्याचे कळतेय.
गिरीशभाऊंनी यावेळी राजकीय जीवनात मी दोन हात करण्यास कधीही तयार असल्याचे सांगत अनेकांची उमेदवारी बाद होण्याचे अप्रत्यक्षरित्या संदेश दिलेत. एवढेच नव्हे तर आव्हानात्मक भूमिकाही घेतल्याचे कळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐनवेळी घात केल्यामुळे गिरीश महाजन प्रचंड संतापलेले होते. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत समोर येत आहेत. अगदी जिल्हा बँक निवडणूकीचे पडसाद भविष्यात मोठ्या प्रमाणात बघावयास मिळणार असल्याचेही कळते.
दरम्यान, कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीने भाजपासोबत निवडणूक लढण्याबाबत तीव्र विरोध दर्शविल्याचे कळते. अगदी प्रदेशपातळीवरून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज याबाबत सूचना देण्यात आल्याचेही कळतेय. आज दिवसभर झालेल्या घडामोडीनंतर गिरीश महाजन यांनी जिल्हा बँकेत एकाहूनएक तगडे उमेदवार देण्याची आखली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार उद्या भाजपचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. थोडक्यात शांतेत होणारी निवडणूक आता मोठ्या जोरात होणार असल्याचे दिसत आहे.
तर दुसरीकडे आज सायंकाळी भाजपने देखील स्वबळाची तयारी केली आहे. उद्या भाजपकडून सर्व २१ जागांवर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. मी स्वतः सोसायटी मतदार संघातून फॉर्म भरणार असल्याचे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी खा.उन्मेष पाटील, खा.रक्षाताई खडसे, आ.संजय सावकारे, आ.राजुमामा भोळे, आ.मंगेश चव्हाण व माजी जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन आदी उपस्थित होते.