जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मुबलक पिकणाऱ्या केळीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा भाग म्हणून बनाना क्लस्टर व्हीलेज निर्माण करून व्यक्तिगत लाभाच्या गोदाम योजनेतून प्रत्येक केळीच्या शेताच्या बांधावर कोल्ड स्टोरेज उभारता येणार असल्याने जिल्ह्याच्या उत्पादन क्षमतेला उंची प्राप्त व्हावी म्हणून शिवार तिथे गोदाम योजनेला जिल्हा प्रशासन प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन देणार असल्याची भूमिका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली.
आ.शिरीष चौधरी व आ.पाटील यांची प्रस्ताव सादर करण्याची प्रशासनाकडे मागणी !
मुक्ताईनगर विधानसभेचे आ.चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आ.शिरीषदादा चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना केळी पिकाचे विपुल उत्पादन होणाऱ्या त्यांच्या मतदारसंघात कोल्ड स्टोरेज व्हावेत म्हणून वखार महामंडळ, कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सादर शिवार तिथे कोल्ड स्टोरेज उभारण्याच्या कामी जिल्ह्यातील फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना (एफपीओ) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नोडल एजन्सी नेमाव्यात आणि गतिशिल काम उभारावे म्हणून उपाययोजना करण्याची शिफारस केली होती.त्यादृष्टीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जिल्हा परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी भाजीपाला व विशेषत: टोमॅटो उत्पादकांना व्यक्तिगत लाभाच्या गोदामांची निर्मिती करून दिली असल्याने त्याच धर्तीवर दोन्ही आमदारांचा प्रस्तावावर काम करण्याची भूमिका घेतली.
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीनंतर आ.शिरीष चौधरी यांची शिफारस घेवून शिरसाळा मारोती आत्मनिर्भर फार्मर प्रोड्युसरचे तज्ञ संचालक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात अध्यक्ष भगवान देवराम वंजारी, व्यवस्थापकीय संचालक सुभाष पोतदार व कृषी व्यवसाय व्यवस्थापनच्या रिसर्च फेलो भाग्यश्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेवून शिवार तिथे गोदाम आणि कोल्ड स्टोरेज योजनेच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठकीची मागणी केली.
जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी व्यक्तीगत लाभाच्या गोदाम योजनेचा लाभ घेवून गोदामातच कोल्ड स्टोरेज उभारून पुणे जिल्ह्यातील नारायणगाव आणि इतर ठिकाणच्या टोमॅटो तसेच भाजीपाला उत्पादकांचा पॅटर्न राबवावा.जिल्ह्यात कार्यरत फॉर्मर प्रोड्युसर कंपन्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना नोडल एजन्सी म्हणून मार्गदर्शन करावे,शिवार तिथे गोदाम योजनेला जिल्हा प्रशासन प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन देईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांनी सुद्धा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी मिळावी म्हणून केळीच्या प्रत्येक उपक्रमाला सकारात्मक घेण्याचे आवाहन केले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल,हाजी मुफ्ती हारून, विजय पाठक,रवींद्र नवाल,विजय पाटील, तूषार वाघुळदे,आदी उपस्थित होते.