जळगाव (प्रतिनिधी) नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरीकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ जुन, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे होणार आहे. ज्या नागरीकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात.
तसेच यादिवशी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक देखील होणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील विभागातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्याबाबतचा निपटारा करुन यादिवशी आवश्यक त्या अहवालासह वेळेवर उपस्थित राहावे. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.