जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला.
आरोग्य विभागामार्फत आज जिल्हाभरात पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ रविवारी सकाळी पालकमंत्री ना. पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. एम. एन. पट्टणशेट्टी, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, अधिसेविका कविता नेतकर आदि उपस्थित होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रुद्राक्ष गोपाळ पाटील या बालकाला पल्स पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षाखालील बालकांना पोलिओचा डोस पाजून घ्यावा. एकही मुलाला पोलिओ होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम असून पालकांनीही आपल्या मुलांना पोलिओ लस घेऊन यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री ना. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रास्ताविकात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.