जळगाव (प्रतिनिधी) माझ्यामुळे उन्मेश पाटील हे खासदार झाले, या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर उन्मेश पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे. पालकमंत्री हप्ते घेतात, असेही म्हणायला खासदार यावेळी विसरले नाही. कॅबिनेटला नियोजन करायचे नाही, मग काय हप्ते घ्यायला, म्हणजेच भत्ते घ्यायला मंत्री कॅबिनेटमध्ये जातात का?, असे म्हणत हा माझा नाही तर जनतेच्या मनातील प्रश्न असल्याचे खासदार पाटील यांनी म्हटले आहे.
जळगावातील जीएम फाउंडेशनमध्ये भाजपतर्फे सोमवारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २२ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील विविध महामार्गांच्या कामांच्या उद्घाटनासाठी, तसेच भूमीपूजनासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती. पत्रकार परिषदेनंतर खासदार उन्मेश पाटील पत्रकारांशी बोलत होते.
‘मंत्री पाटील माझ्यावर बोलून तोंडसुख घेताहेत’
खासदार उन्मेश पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, माझे अस्तित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच तळागाळातील जनता ठरवेल. मात्र आता ही वेळ नाही, जनता अंधारात आहे, तो प्रश्न आधी महत्वाचा आहे. विजेवर बोला, असे सांगतानाच कॅबिनेटच्या बैठकीत पालकमंत्री झोपा काढतात, असा पुनरुच्चारही यावेळी खासदार पाटील यांनी केला. कॅबिनेटला नियोजन करायचे नाही, मग काय हप्ते घ्यायला, म्हणजेच भत्ते घ्यायला मंत्री कॅबिनेटमध्ये जातात का?, असे म्हणत हा माझा नाही तर जनतेच्या मनातील प्रश्न असल्याचे खासदार पाटील यांनी म्हटले आहे.
जे शेतकऱ्यांसाठी शिंगाडा हातात घेवून आंदोलन करत होते, ते पालकमंत्री गुलाबराव पाटील कुठे गेले हे जनतेच्या मनातले मी त्यांच्या लक्षात आणून देत असल्याचेही खासदार पाटील म्हणाले. प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, प्रश्न विजेचा आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत माझ्यावर बोलून तोंडसुख घ्यायचे काम पालकमंत्री करत असून, यातून त्यांना काय मिळते, हे देव जाणे, असाही टोला यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला.
खासदार उन्मेश पाटील यांनी कोळसा आणला असता, तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता, असे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावर खासदार पाटील यांना विचारले असता, सत्ता तुम्ही भोगायची, नियोजन तुम्ही करायचे नाही, आणि उन्मेश पाटील यांनी कोळसा आणला नाही, अशी टीका करायची, याला काही अर्थ नाही. त्यामुळे मंत्री पाटील यांनी कॅबिनेटमध्ये लक्ष घातले, तर त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असेही जोरदार प्रत्युत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना खासदार उन्मेश पाटील यांनी दिले.