मुंबई (वृत्तसंस्था) आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा पाहू नका, असं म्हणत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
एका जाहीर कार्यक्रमात बोलाताना शिवसेना नेते तानाजी सावंत म्हणाले, “२०१९ पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलेलं दाखवावं, मी आता आमदरकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि मग कांड पिकवने ज्याला आपण म्हणतो, मग या पक्षाचा स्त्रोत कुठे आहे? यांचा चालेला घोडा कसा आवरायचा? पक्षाला खाली कसं आणायचं? विविध पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरून ज्या पद्धतीने दोन वर्ष कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी आज या कार्यक्रमामध्ये आणि मी मागेही एकदा पुण्यात बोललो होतो, की तुम्ही आमचं का वाकून बघात तुम्ही तुमचं बघा काय सुरू आहे. आम्ही ठीक आहोत, आमच्या सर्वांच्या श्रद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आहेत. आमच्या या ठिकाणी मागून काही मिळत नाही, रडल्याने काही मिळत नाही आमच्याकडे आदेश चालतो आणि आदेशाची वाट आमदार, खासदार, मंत्री किंवा शिवसैनिक असो प्रत्येकजण आम्ही आतुरतेने बघतो. आम्ही त्या आदेशानुसार चालतो. आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. विषयच नाही, कडवा शिवसैनिक ज्याच्या मनगटाच्या ताकदीवरती, त्याने कधी ऊन, वारा, पाऊस किंवा काही साम,दाम मिळते की नाही याचा विचार केला नाही. शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे. त्याच्या मनगटातील रग ही वेगळीच आहे, ती कुठल्याही पक्षाने आजमावण्याचा प्रयत्न करू नये. भविष्यातही करू नये आणि मागे केला तर त्यांना काय मिळालं हे त्यांनी बघितलेलं आहे.”
तसेच, “नुकतच आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं आहे. मागील दोन-अडीच वर्षांमध्ये सर्व माध्यमं देखील दाखवत आहेत आणि आम्ही देखील सभागृहाच्या बाहेर बघतोय आणि आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, मग कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडामधील असतील आमच्या सगळ्यांची मानसिकता एक झालेली आहे. शिवसेनेला कुठंतरी दुय्यम वागणूक मिळत आहे आणि हे अर्थसंकल्पातून देखील प्रतिबिंबित झालेलं आहे. विरोधी पक्षांनी ओरडायचं त्यांचे काम आहे त्यांना ते करू द्या. तथ्य काय आहे तर तथ्य हेच आहे. आज ५७ ते ६० टक्के बजेट हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जातं. जवळपास ३०-३५ टक्के बजेट हे काँग्रेसला दिलं जातं. शिवसेनला १६ टक्के बजेट दिलं जातं. या १६ टक्के बजेट मधलं आज उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री आमचे असल्याने पगारावरतीच सहा टक्के जातं, मग विकासासाठी काय? विकासासाठी केवळ १० टक्के आहे. खेदाने व्यक्त करतो माझ्या मतदारसंघात असेल, उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा सोलापुर, यवतमाळच्या देखील जिल्हाप्रमुख संपर्क प्रमुखांचे मला फोन असतात, की त्या ठिकाणचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायतचा सदस्य देखील हसन मुश्रीफांकडे जाऊन एक-दीड कोटींची कामे घेऊन येतो आणि आपल्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, खासदाराचा तर विषयच येत नाही आणि मग शिवसेनेसाठी काय? नुसतच गोडगोड. आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. आम्ही सहन करणार, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या शरिरात आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा पाहू नका. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत.” असा इशारा तानाजी सावंत यांनी यावेळी दिला.