पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात गुरुवारी एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, दोन तीन दिवसांत कळेल, असे म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत पाटलांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मात्र राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसंच पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलंय. पाटील यांच्या बोलण्याच्या नेमका काय अर्थ असावा, याचे राजकीय कंगोरे उलगण्याचा बरेच जण प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपशी युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात आणखी काही वेगळं समीकरण पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून अशाप्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमची कोअर कमिटी निर्णय घेईल. असा काही प्रस्ताव असेल तर तो राज्याच्या प्रदेशाध्यक्षांकडेच यायला हवा. आमचा पक्ष हा जगभर पसरलेला आहे. देशात १२ राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे इतक्या सहजपणे हे निर्णय होत नाहीत. त्याची मोठी प्रक्रिया असते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.