मुंबई (वृत्तसंस्था) ‘महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ६ डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकूमार जायस्वाल,आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ज्येष्ठ विचारवंत डा. भालचंद्र मुणगेकर, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सचिव नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सी. एल. थूल उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही ६ डिसेंबर रोजी अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं.