सोलापूर (वृत्तसंस्था) पंढरपूरच्या विठुरायाची महिमा न्यारी आहे. महाराष्ट्राचे विठ्ठल हे दैवत आहे. पंढरपूरचा विठुराय भाविकांना सुखावतो. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात. विठ्ठल दर्शनाची आस अनेकांना स्वस्थ बसू देत नाही. मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील चौदा वर्षांच्या बाल भाविकाने देखील आई-वडील जाऊ देणार नाहीत म्हणून चक्क घरच सोडले. परंतू कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मुलाचा शोध घेत त्याला पालकांच्या स्वाधीन केले.
रविवार, दि. १८ जून रोजी सकाळी सव्वासहा वाजता भोसे येथील चौदा वर्षीय मुलगा हा भैरवनाथ मंदिरात आरतीसाठी जातो, असे सांगून घरून मोटारसायकलवरून निघाला होता. रात्री उशिरा मुलगा घरी न आल्याने वडिलांनी मंदिरात जाऊन अधिक चौकशी केल्यानंतर तो आरतीला आला होता. मात्र, आरती संपल्यानंतर तो तेथून निघून गेला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भेदरलेल्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार मिळताच एक खास शोध पथक तयार केले. या पथकाने मंगळवेढा ते पंढरपूर मार्गावर असणारे सी.सी.टी.व्ही. फुटेज मिळवून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती काहीही लागले नाही.
पंढरपूर शहरातील एस.टी. बसस्थानकात असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये तो बेपत्ता मुलगा दिसून आल्याने तपासाला दिशा मिळाली. पोलिस पथक तपास करीत असताना बसस्थानक परिसरात एका कोपऱ्यामध्ये बालक बसलेला दिसून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली होती. आई-वडील जाऊ देणार नाहीत म्हणून गुपचूप निघून आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बालकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबतचे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे.