मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या प्रकरणी सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ सुरु आहे. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी आता सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाचा एप्रिल फूल करु नका. आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम रहा, असं शेलार यांनी म्हटलं.
मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका अशा शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर ते पुढे म्हणतात, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आरक्षणाचं जाऊद्या, सवलती द्या अशी भूमिका घेतली आणि काल मंत्री राज्यपालांची भेट घेताना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. या त्यांच्या भूमिकेमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सरकार मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याचबरोबर ते असंही म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दलच्या गायकवाड अहवालाचं भाषांतर करण्यात आलं नाही आणि त्यामुळे या अहवालातले प्रमुख मुद्दे योग्य पद्धतीने समोर आले नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही आरक्षणाचा कायदा रद्द करत आहोत, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला. यानंतर मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे.