मुंबई (वृत्तसंस्था) दिशा सालियानची ८ जून आणि सुशांतची १३ जूनला हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्र्यांचा दोनदा फोन आला होता. आपण सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
साधारण दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राज्यात आता पुन्हा एकदा वादळ उठले आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या काही दिवस आधीच दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात शनिवारी रात्री उशीरापर्यंत तब्बल ९ तास त्यांची मालवणी पोलिसांनी चौकशी केली. चौकशीनंतर नारायण राणेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “दिशा सालियानची ८ जून आणि सुशांतची १३ जूनला हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्र्यांचा दोनदा फोन आला होता. आपण सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका. मी हे जबाबात सांगूनही हे वाक्य माझ्या जबाबातून वगळलेलं आहे. मी वारंवार सांगतोय की ते वाक्य टाका परंतु ते वगळलेलं आहे. याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतून प्रेरित आहे. मुद्दाम आमच्यावर दबाव टाकण्याच प्रयत्न करत आहेत”, असा दावा राणेंनी यावेळी केला.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. ८ जूनला दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केली. सांगितलं गेलं आत्महत्या केली. एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती. तिला जबरदस्तीनं बोलावलं. तिचा मित्र रोहन राय यानं. त्यानंतर तिला थांबायला सांगितलं, ती थांबली नाही. ती घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते, पोलीस सुरक्षा कुणाला होतं, तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती. तिच्या पोस्ट मॉर्टमचा अहवाल अजून बाहेर का आलेला नाही? ७ महिने झाले, अजून का बाहेर आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची, त्या इमारतीच्या रजिस्टरची ८ जूनची पानं का नाहीत? कुणी फाडली?” असा सवाल राणेंनी केला होता.