धरणगाव (प्रतिनिधी) माझ्या नादी लागू नका. संजय राऊत सारख्यांना मी घाम फोडतो. तर, बाकीचे कुठे?, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या जळगावधील पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. ते धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, दोनगाव येथील कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच दोनगाव येथील कार्यक्रमाचे बॅनर देखील फाडण्यात आले होते. याच गोष्टींना भरसभेत प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनीही खोचक प्रत्युत्तर दिले. गुलाबराव पाटील म्हणाले, माझ्या नादी काय लागता. मी बारक्यांच्या नादी लागत नाही. संजय राऊतांसारख्या माणसाला मी घाम फोडतो. विधानसभेच्या सभागृहात नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो भाऊ काय बोलणार आहे, असेही पाटील म्हणाले.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावरुन शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, लोकांना आता बदल हवा आहे, असेही शरद पवार म्हणाले. याला देखील गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ना. पाटील म्हणाले, नागालँड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार निवडून आल्यामुळे शरद पवार नक्कीच आनंदी असतील. मात्र, त्यामुळे राज्यातही सत्ता परिवर्तन होईल, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक राज्याचे गणित वेगवेगळे असते. राज्यांमधील समस्या वेगवेगळ्या असतात. त्या परिस्थितीनुसार लोक मतदान करत असतात, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.