चाळीसगाव (प्रतिनिधी) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. १४ एप्रिल २०२१ रोजी येणाऱ्या जयंतीबाबत विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक स्वाभिमानी जयंती उत्सव समितीची बैठक नानासाहेब बागुल यांच्या अध्यक्षतेखाली दि. ५ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात यावर्षी १३ व १४ एप्रिल रोजी कोणताही सार्वजनिक व गर्दी जमा होईल असा कार्यक्रम करायचा नाही, असा निर्णय संयोजक समितीने एकमताने घेतला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासनाने घालून दिलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर जन हितार्थ सदर निर्णय घेण्यात आला असून सदर बैठकीस कालिदास अहिरे, नगरसेवक रामचंद्र जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास जाधव, गौतम जाधव, नगरसेवक रोशन जाधव, वंचित बहुजनचे संभा आप्पा जाधव, युवा नेते शरद जाधव, विजय जाधव, बबलु जाधव, किरण जाधव हे प्रमुख संयोजक उपस्थित होते. सर्वांनी एकमताने सदर निर्णय घेतला असून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन यांना हे निवेदन देण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेने वरीलप्रमाणे झालेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी करावी. शासनाचे आदेश पाळावे व कोरोनाच्या बाबतीत सर्व ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन चाळीसगाव तालुका विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव संयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे.