जळगाव (प्रतिनिधी) सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने बुधवारी बहुप्रतीक्षित १९ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली. नागरिकांना हरकतींसाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असताना पहिल्याच दिवशी चार हरकती दाखल झाल्या. दरम्यान, निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
एकूण १९ प्रभागातील ७५ सदस्यांच्या निवडीसाठी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. पैकी १८ प्रभाग हे चार सदस्य संख्येचे तर एक प्रभाग तीन सदस्य संख्येचा असणार आहे. पाच सदस्य संख्येचा एकही प्रभाग अस्तित्वात नाही. संबंधित सर्व प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांसह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली.
अवघ्या काही तासात हरकती
प्रत्यक्षात, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रभागात यावेळी फेरबदल झाला आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसून आला. प्रभाग रचनेवरील हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया लगेच सुरू झाल्याने अवघ्या काही तासात चार हरकती दाखल सुद्धा झाल्या.
हरकती स्विकारण्यासाठी पथक
प्रभाग समितींच्या कार्यालयातही प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानुसार, संबंधित अधिकारी प्रभाग समिती एक ते चारमधील कार्यालयात नागरिकांकडून हरकती स्वीकारतील. तसेच हिमांशू भावसार, संदीप अत्तरदे, रामेश्वर चकणे, समाधान बारी आणि बळीराम सुर्यवंशी हे आयुक्त कार्यालयात हरकती स्वीकारण्याच्या कामात मदत करतील. व्यवस्थित नोंद घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
या पथकाचे नेतृत्व
नागरिकांकडून येणाऱ्या हरकती आणि सूचनांची नगर रचनाकार अमोल पाटील करतील. पाटील यांच्यावर सर्व हरकती आणि सूचना एकत्रित करणे, त्यांची नोंद व्यवस्थित ठेवणे आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही सुनिश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या कामात रचना सहायक समीर बोरोले, विजय मराठे, अतुल पाटील तसेच कनिष्ठ अभियंता योगेश वाणी यांच्यावरही जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
१६ ते २२ सप्टेंबर दरम्यान सुनावणी
१५ सप्टेंबरपर्यंत दाखल होणाऱ्या हरकतींचाच विचार केला जाईल. त्यानंतर दाखल झालेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुदतीत दाखल होणाऱ्या हरकतींची सुनावणी १६ ते २२ सप्टेंबर दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. त्यानंतर हरकतींच्या अनुषंगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल. हरकती स्वीकारण्याची जबाबदारी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. त्यानुसार, नागरिकांनी प्रभाग रचनेविषयी असलेल्या त्यांच्या हरकती मुदतीत दाखल करण्याचे आवाहन आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे
















