मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ करण जोहरच्या पार्टीचा होता. या पार्टीत दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शाहिद कपूर, वरुण धवन, अयान मुखर्जी, रणबीर कपूर यांच्यासह इतरही अनेक लोक दिसून आले होते. हा व्हिडीओ स्वतः करण जोहरने शूट केला होता.
गेल्या वर्षी व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज पार्टी करत असल्याचं बोललं जात होते. याच व्हिडियोला अनुसरून करण जोहरच्या पार्टीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी एनसीबी कडून करण्यात आली आहे. दरम्यान, या तपासानंतर करण जोहरच्या पार्टीत कोणत्याही सेलिब्रिटींनी ड्रग्स सेवन केले नव्हते, असे म्हणत करण जोहरला क्लीन चीट देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या या पार्टी व्हिडीओला क्लीन चीट दिली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्हाईट लाईन ट्यूबलाइटचा प्रकाश असू शकतो, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या अहवालानुसार, कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटींनी ड्रग्स सेवन केल्याचे आढळले नाही. तसेच व्हिडीओमध्ये कोणताही चुकीचा पदार्थ किंवा अमली पदार्थ सापडलेला नसल्याने, या प्रकरणी क्लीन चीट देण्यात येत आहे. असं एनसीबीच्या अहवालात म्हंटल आहे.