जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध उत्पादक संघात निर्मित अखाद्य (बी-ग्रेडच्या) तूप विक्रीचे व त्यापासून कुठलाही खाद्यपदार्थ निर्मितीचे अधिकार नसताना दूध संघाने चॉकलेट निर्मिती कारखान्यास तूप विक्री केल्याची समोर आले आहे. परंतू ऑगस्ट महिन्यात जळगावचे अनिल अग्रवाल आणि अकोल्याचे रवि अग्रवाल यांनी तूप खरेदी केले. परंतू दुध संघातून एकाचेच वाहन बाहेर पडल्याची नोंद आहे. त्यामुळे दुसऱ्याचा माल कोठून गेला? आणि कोणत्या वाहनातून गेला?, हे स्पष्ट होत नाहीय. परंतू पोलिसांनी संपूर्ण पाळेमुळे खोदायला सुरुवात केलीय. तर दुसरीकडे विठ्ठल-रुखमाई एजन्सी आता जळगाव एफडीएच्या रडारवर आली आहे.
अकोल्यात झाडाझडतीत सापडले होते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड
जिल्हा दूध संघातील १८०० किलो बी ग्रेड तुपाची कमी दरात विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपासात संशयित आरोपी रवि मंदनलाल अग्रवाल हे कैलादेवी कुटीर उद्योग नावाने राजेमलाई चॉकलेटचा व्यवसाय करत होते. ते विठ्ठल रुख्मीणी एजन्सीकडून बी ग्रेड तुप खरेदी करत होते. बी ग्रेडचा वापर Not For Human Use (मानवी वापरास निषिद्ध) असल्याचे त्यांना ते माहीत असूनही त्यांनी ते खरेदी केले. तसेच त्याचा राजेमलाई चॉकलेट बनविण्यासाठी वापर केला. संशयित आरोपी मनोज लिमये, हरी पाटील आणि रवि अग्रवाल यांना देखील याबाबतची कल्पना होती. तरी देखील त्यांनी त्याचा वापर करून लहान मुले व लोकांचे जिवन देखील धोक्यात आणले. त्यामुळे पोलिसांनी रवि अग्रवाला सोबत घेत थेट अकोला गाठले. त्याच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले कागदपत्र सापडली.
पोलिसांनी सापडली आणखी एक एन्ट्री !
अकोल्यातून रवि अग्रवालच्या तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले कागदपत्र सापडली होती. परंतू त्याने काही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली होती. पण आज पोलिसांना रवि अग्रवाल आणि वडील अग्रवाल यांची देखील एक एन्ट्री सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आणखी काही एन्ट्री आहेत का?, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मुळ फिर्यादीप्रमाणे 1800 किलो तूप, प्रतीकिलो 85 रुपये किंमतीप्रमाणे भाव खरेदी केला जात होता. मात्र, तर त्याची विक्री १०० प्रमाणे केली जात होती. थोडक्यात एका किलो मागे १५ रुपये नफा कमावला जात होता.
एकाच महिन्यात दोघांच्या पेमेंटची एन्ट्री पण संघातून बाहेर पडले एकाचेच वाहन
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अकोल्याचे रवि अग्रवाल आणि जळगावचे अनिल अग्रवाल या दोघांनी एकाच महिन्यात अर्थात ऑगस्टमध्ये साधारण १६०० ते १७०० किलोचा माल खरेदी करून पैसे दिले आहेत. परंतू धक्कादायक म्हणजे दुध संघातून एकच वाहनातून माल बाहेर पडल्याची नोंद आहे. त्यामुळे मग जळगावचा माल हा कोठून दिला गेला आणि कोणत्या वाहनाने गेला?, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. यातून आणखी मोठी साखळी सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे जळगावात चॉकलेट बनविण्यासह देवाच्या नावानेही तूप खरेदी केले जायचे. पोलिसांनी नुकतेच निमखेडी शिवारातील मंदिरातून १५ किलो प्रमाणे ६ तुपाचे डब्बे जप्त केले होते. महिन्याला साधारण मंदिरात ३३ डब्बे लागतात, या हिशोबाने ४०० ते ४५०० किलो माल वापरला गेला असेल तर ऑगस्टमधील खरेदीच्या रेकॉर्ड प्रमाणे उर्वरित ८०० ते ८५० किलो माल कुठं गेला?, याचा शोधही पोलीस घेत आहेत.
विठ्ठल-रुखमाई एजन्सी आता जळगाव एफडीएच्या रडारवर ; सोमवारी तपासले जाणार रेकॉर्ड
जळगाव एफडीएला आज शहर पोलिसांनी तपासात सहकार्य करण्यासाठी मदत करावी, असे एक पत्र दिले आहे. तर दुसरीकडे जळगाव एफडीए पथक आज दुध संघात गेले होते. परंतू संपूर्ण रेकॉर्ड पोलिसांनी सील केला असल्यामुळे त्यांना आज कुठलेही कागदपत्र मिळू शकले नाहीत. परंतू आता एफडीए विठ्ठल-रुखमाई एजन्सीची कसून चौकशी करणार आहे. विठ्ठल-रुखमाई एजन्सीना एफडीएने किरकोळ विक्रीचे लायसन्स दिले आहे. परंतू सध्याच्या चर्चेनुसार ते होलसेलचा व्यापार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अटीशर्थींचा काही भंग झालाय का? लायसन्स घेतांना दिलेले कागदपत्रानुसार पत्ता बरोबर आहे का? यासह मागील काही महिन्यातील खरेदी-विक्रीचा संपूर्ण रेकॉर्ड जळगाव एफडीए तपासणार आहे.