जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणाच्या चौकशीला जळगाव पोलिसांनी जोरदार गती दिली आहे. अखाद्य तूपापासून चॉकलेट तयार करणारा संशयित आरोपी रवी अग्रवाल याला घेऊन आज जळगाव पोलिसांचे अकोल्यात पोहचले होते. याठिकाणी त्यांना तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन व्यवहार संबंधीचे रेकॉर्ड मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर, कुणाला समजून नये नेमकं तूप कोणत्या प्रकारचे आहे, म्हणून लेबल फाडून तुपाची विक्री केली जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
अकोल्यात झाडाझडतीत सापडले साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड
जिल्हा दूध संघातील १८०० किलो बी ग्रेड तुपाची कमी दरात विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपासात संशयित आरोपी रवि मंदनलाल अग्रवाल हे कैलादेवी कुटीर उद्योग नावाने राजेमलाई चॉकलेटचा व्यवसाय करत होते. ते विठ्ठल रुख्मीणी एजन्सीकडून बी ग्रेड तुप खरेदी करत होते. बी ग्रेडचा वापर Not For Human Use (मानवी वापरास निषिद्ध) असल्याचे त्यांना ते माहीत असूनही त्यांनी ते खरेदी केले. तसेच त्याचा राजेमलाई चॉकलेट बनविण्यासाठी वापर केला. संशयित आरोपी मनोज लिमये, हरी पाटील आणि रवि अग्रवाल यांना देखील याबाबतची कल्पना होती. तरी देखील त्यांनी त्याचा वापर करून लहान मुले व लोकांचे जिवन देखील धोक्यात आणले. त्यामुळे पोलिसांनी रवि अग्रवाला सोबत घेत थेट अकोला गाठले. त्याच्या कंपनीच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले कागदपत्र सापडली.
डब्यावरील लेबल फाडून तुपाची विक्री
या प्रकरणात आतापर्यंत निखिल नेहते, मनोज लिमये, हरि पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल, सी.एम.पाटील, रवी अग्रवाल यांना अटक झाली आहे. रवी अग्रवाल याला अकोल्यातून अटक झाली होती. तो बी ग्रेड तुपाचा चॉकलेटमध्ये वापर करित असल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्याअनुषंगाने गुरूवारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप परदेशी, रवी पाटील यांचे पथक रवी अग्रवाल याला घेऊन अकोल्यात धडकले होते. संदीप परदेशी यांनी रवी अग्रवाल याचे बॅंक स्टेटमेंटसह कंपनीचे कागदपत्रांची तपासणी केली. त्यात तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन ट्रॉन्झॅक्शन सापडले आहे. एवढेच नव्हे तर दूध संघातील बी ग्रेड तुपाचे डबे अकोल्यात पोहोचल्यानंतर रवी अग्रवाल हा डब्यावरील लेबल फाडून तुपाची विक्री करित असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहारशी संबंधी रेकॉर्ड मिळाल्यामुळे हा गोरखधंदा अनेक दिवसापासून सुरु असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.