जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे संस्थापक माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू व विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांचे पुतणे जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला. सहकार,शिक्षण व सामाजिक क्षेत्रा काम करणारे निकम आता थेट राजकारणात सक्रीय झाल्यामुळे भाजपाच्या हाती मोठं ट्रम्प कार्ड लागलं आहे.
रोहित निकम हे जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे ते संचालक, तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक ‘कृभको’मुबंई चे सदस्य आहेत. तसेच इतर सहकार संस्थावर ते सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या मातोश्री शैलजा दिलीप निकम या जिल्हा बँकेच्या संचालक आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्याही आहेत. वडिल दिलीप निकम हे प्रगतीशील शेतकरी असून तर काका ॲड.उज्वल निकम हे राज्याचे विशेष सरकारी वकिल आहेत. एवढेच नव्हे तर, रोहित निकम यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम यांच्या नावाला जळगाव जिल्ह्यात एक वेगळं सामाजिक आणि राजकीय वलय आहे. थोडक्यात रोहित निकम यांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील भाजपला एक मोठा मराठा चेहरा मिळाला आहे.
आगामी लोकसभा, विधानसभेच्या दृष्टीने विचार केला. तर रोहित निकम हे मोठा मराठा चेहरा म्हणून समोर येण्याची दाट शक्यता आहे. भाजप आता त्यांना नेमक्या कोणत्या रिंगणात उतरवते?, हे पाहणं औस्तुक्याचे ठरणार आहे. आजोबा बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा मतदार संघातून १९५५ ते १९५९ ला आमदार म्हणून निवडणून आले होते. त्यामुळे निकम परिवाराची नाळ अजूनही चोपडा तालुक्यात जुळून आहे. तर दुसरीकडे रोहित निकम यांच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा गोतावळा जिल्ह्यात विस्तारलेला आहे. निकम हे आयटी सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचा थेट तरुणांशी संपर्क आहे. त्यामुळे रोहित निकम नावाचं ट्रम्प कार्ड आता भाजप नेमकं कुठं आणि कसं वापरणार?, याचीच उत्सुकता जिल्ह्यात लागली आहे. दरम्यान, निकम यांच्या राजकीय प्रवेशामुळे त्यांच्या परिवारातील तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे.