यावल (प्रतिनिधी) वीज बिल थकीत झाल्यानंतर कनेक्शन कट केल्याच्या रागातून महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप संजय चौधरी (वय २६, रा. मोरेवाडा डांगपुरा यावल) असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
या संदर्भात महेद्र सीताराम कुरकुरे (वय ३०, धंदा : महावितरण कार्यालय यावल रा.न्हावी ता.यावल) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, विजबिल बाकी असल्याने प्रदीप चौधरी हे राहत असलेल्या भाड्याच्या घराचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. याचाच राग येऊन दि.२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रदिप चौधरी याने महावितरण कार्यालयात येऊन वरीष्टांनी दिलेल्या विजबीलाची वसुली करण्याचे तसेच थकीत विज बिल ग्राहकांचे विज कनेक्शन कट करण्याचे शासकीय कामापासून महेद्र कुरकुरे यांना धाकाने परावृत्त करण्यासाठी धक्का-बुक्की करुन शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रदीप चौधरी विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरीक्षक सुनिता कोळपकर ह्या करीत आहेत.