धरणगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र प्राप्ती नंतर तालुक्यातील दुसखेडा गावाला जोडणारा रस्ता नुकताच पूर्ण झाला आहे. याचा आनंद व्यक्त करून या ठिकाणच्या नागरिकांनी पक्षभेद विसरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
तालुक्यातील झुरखेडा-दुसखेडा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. दुसखेडा अवघे १५०-२०० लोकसंखेचे गाव आहे. या गावात संपूर्ण भिल्ल आणि अदिवाशी बांधव वास्तव्यास आहेत. गावात रस्ता करण्यासाठी आजुबाजूच्या शेतकऱ्यांची समजून काढून जागा मिळविणे कठीण होत होते. दुसखेडा-झुरखेडचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी तात्काळ धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना त्याबाबतचे आदेश दिलेत. त्यानंतर माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी देखील ग्रामस्थांची भेट घेत स्वत: रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.
या रस्त्यामुळे परिसरातील ५०० एकर शेतीला पूरक असा शेतरस्ता देखील मिळाला आहे. पावसाळ्याचे दिवसात नागरिक व शालेय विद्यार्थी यांना पायवाटेने चिखल तुडवून प्रवास करावा लागत होता. गावासाठी रस्ता झाला पाहिजे या साठी ग्रामस्थांच्या वतीने वारंवार शासन दरबारी समस्या मांडण्यात आली होती. अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मध्यास्थितीने ग्रामस्थांची समजूत काढून शेतातून दीड किलो मीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण होत आहे.
मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत प्राधान्याने, रस्ते आणि पाणी पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या हातून होत आहे. काही गावांना रस्ते आणि पुलाच्या समस्या त्रस्त करणाऱ्या होत्या. यात दुसखेडा येथील शालेय विद्यार्थी, नागरिक यांची होणारी होरपळ मनाला अस्वस्थ करणारी होती. आता रस्त्याचे काम पूर्ण होत असल्यामुळे समाधान आहे. मतदार संघाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न एक लोकप्रतिनिधी म्हणून कायमच माझा असणार आहे.
-गुलाबराव पाटील (पालकमंत्री, जळगाव)
















