नागपूर (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहे. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. दरम्यान, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
रिसोडनजीकच्या देगाव येथे खासदार गवळी यांचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना आणि भावना पब्लिक स्कूल व डीएमएलटी कॉलेज आहे. तर शिरपूरला वरिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्वच ठिकाणी ईडीने छापे घातले आहेत. बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये निश्चितच काहीतरी गौडबंगाल आहे. पण शाळा आणि महाविद्यालयांत तसे काहीही नसल्याचे शिवसैनिक सांगत आहे.
सोमय्यांनी वाशीम गाठून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी खासदार गवळींच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला होता, त्यांच्यावर शाईसुद्धा फेकली होती. त्याचवेळी सोमय्यांनी गवळींना आव्हान दिले होते आणि ईडी, आरबीआयकडे तक्रार केली होती. सोमय्या यांनी गवळी यांच्यावर बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व पंकज चौधरी आणि सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांची भेट घेतली होती. सोमय्या यांनी तेव्हाच ट्विटवरूनही ही माहिती दिली होती.
भावना गवळींचा १०० कोटींचा घोटाळा. १८ कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात ७ कोटी रोख ठेवणे, बँकांना फसविणे आदी आरोप लावण्यात आले आहेत. गवळींच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्याने चौकशी थांबेल, असे त्यांना वाटले असावे. पण आता त्यांचा हा भ्रम तुटला आहे. घोटाळे करण्याऱ्यांना पाठीशी घालण्याचे पाप राज्य सरकारने केले असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.