मुंबई (वृत्तसंस्था) लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्यांची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही. या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजपा करतेय. त्याचाच परिणाम आपल्याला राज्यात दिसतोय, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने गेल्या आठवड्यात छापे टाकले. आता उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अमित शाह यांच्याकडे केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
आरोप तर सगळ्यांवरच होतात. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंतप्रधान सहायता निधीत भ्रष्टाचार केल्याचे आरोप आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी, अशीही मागणी पटोले यांनी केली. पण ईडी आणि सीबीआय या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजपा करतेय. त्याशिवाय, राज्यपालांच्या अधिकारांचा दुरुपयोग करून भाजपा ज्या पद्धतीने अशांतता माजवत आहे, हे सगळे लोक बघत आहेत. हे लोकशाहीला धरून नाही, असंही पटोले म्हणाले.