मुंबई (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री यामी गौतम हिला चौकशीसाठी समन्स बजावले असल्याची घटना ताजी असताना आज अभिनेता डिनो मोरियाची मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीने काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचं ईडीने सांगितलं. संपत्तीची एकूण किंमत ८.७९ कोटी रुपये असल्याचं ईडीने आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यात आठ मालमत्ता, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स/म्युचल फंड यांचा समावेश आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने म्हटलं आहे की, जप्त केलेल्या संपत्तीपैकी तीन कोटी रुपयांची मालमत्ता संजय खान यांची आहे. डिनो मोरियाची संपत्ती १.४ कोटी रुपये आहे आणि डिजे अकील नावाने लोकप्रिय असलेल्या अकील अब्दुलखलील बचूअलीची संपत्ती १.९८ कोटी रुपये आहे. तर अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती २.४१ कोटी रुपयांची आहे.
ईडीने म्हटलं आहे की, “स्टर्लिंग बायोटेक समूहाचे फरार प्रवर्तक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी आपल्या गुन्ह्यातून जे धन मिळवलं ते या चार जणांना दिलं. प्रवर्तक बंधु नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना एका विशेष कोर्टाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं आहे. पैशांच्या अफरातफरीचं हे प्रकरण १४ हजार ५०० कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याशी संबंधित आहे. स्टर्लिंग बायोटेक आणि कंपनीच्या मुख्य प्रवर्तक आणि संचालकांनी हा कट रचला होता.