जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद-उमाळा ते औरंगाबाद मार्गाने बेकादेशीर विना पास परवाना आयशर ट्रकमध्ये ११ बैलांची कोंबुन वाहतुक करतांना आढळून आल्याने एमआयडीसी पोलिसांनी आयशर ट्रक जप्त केला आहे. तसेच पळून गेलेल्या ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बैलांना सुरक्षितरीत्या गोशाळेत रवाना करण्यात आले.
मिळालेल्या माहिती नुसार, नशिराबाद ते उमाळा अशा मधल्या आडमार्गाने निर्दयीपणे ट्रकमध्ये बैल कोंबुन नेले जात असल्याची गुप्त माहिती पेलिसांना मिळाली होती. उमाळा बसस्थानकाजवळ ग्रामस्थांनी अडवलेल्या ट्रक क्र (एमएच.४६ ए. एफ५५५४) आयशर ट्रकची पहाणी केली असता त्यात बैलांना वाहुन नेण्यात येत असल्याचे आढळून आले. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चौकशी केली असता उभ्या ट्रकमध्ये वेगवेगळ्या जातीचे ११ बैल निर्दयीपणे कोंबुन घेवुन जात असल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी ट्रक अडवताच चालकाने वाहन सोडून पळ काढला. समाधान गुलाब पाटिल (वय-३० रा. कांचन नगर) यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ट्रकमध्ये मिळून आलेल्या ११ बैलांना गोशाळेत सुखरुपरित्या सोडण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र राजपुत करत आहेत.