धरणगाव (प्रतिनिधी) गणेशोत्सव येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यंदा अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला आहे. त्याचदिवशी मुस्लिम बांधवांची ‘ईद ए मिलाद’ आहे. त्यामुळेच हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी २८ सप्टेंबरचा दिवस महत्त्वाचा आहे. दोन्ही सण निर्विघ्न आणि शांततेत पार पाडावेत या उद्देशाने, अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद ए मिलाद’ची मिरवणूक काढण्याचा ऐतिहासिक निर्णय धरणगाव पोलीस स्थानकाच्या बैठकीत मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.
अनंत चतुदर्शी आणि ‘ईद ए मिलाद’च्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी धरणगाव पोलीस स्थानकात मुस्लीम बांधवांची बैठक बोलावली होती. गणेश चतुर्थीपासून मनोभावे गणपती बाप्पाची पूजा, आराधना केली जाते. 10 व्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह असतो. मोठी गर्दी रस्त्यावर असते, त्यामुळे ‘ईद ए मिलाद’ची मिरवणूकच्या तारखेत काही बदल करता येईल का?, अशी विचारणा पो.नि. ढमाले यांनी केली. त्यावर मुस्लीम बांधवांनी सकारात्मक भूमिका घेत ईद मिलाद-उल-नबीची मिरवणूक पुढे ढकलण्याचा एकमुखी निर्णय धरणगावातील मुस्लिम समुदायाने घेतला.
गणेशोत्सव हा आमच्या हिंदू बंधूंचा सण आहे. त्यामुळे धार्मिक सहिष्णुता आणि सलोख्याच्या दृष्टीकोनातून आम्ही हा निर्णय घेतला, अशा भावना, मुस्लीम बांधवांनी व्यक्त केल्या. तर पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी मुस्लीम बांधवांच्या निर्णयाचं स्वागत केले. यावेळी धरणगावातील मुस्लीम बांधवांसह सपोनि जिभाऊ पाटील, गोपनीयचे मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, वैभव बाविस्कर यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.