सिल्लोड (वृत्तसंस्था) सेवा निवृत्तीची रक्कम बँकेतून काढून सराफा मार्केटमध्ये सोने खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेचे रिक्षात ठेवलेले साडेआठ रुपये चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी (दि. २५) दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. लताबाई लिंगायत (५८, रा. सांवगी जि. छत्रपती संभाजीनगर) असे या महिलेचे नाव आहे.
लताबाई या सांवगी येथून रिक्षाने सिल्लोड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतून निवृत्तीची रक्कम काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी १० लाख रूपये रोख बँकेतून काढले. मात्र सोने खरेदी करायचे असल्याने १ लाख ५० रुपये स्वतःजवळ ठेवत साडेआठ लाख रूपये रिक्षाच्या पाठिमागील स्पीकर बॉक्समध्ये ठेवत त्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी गेल्या. या संधीचा फायदा घेत दोन चोरट्यांनी रिक्षाच्या स्पीकर बॉक्समध्ये ठेवलेली रक्कम लंपास केली.
दरम्यान, सोने खरेदी केल्यानंतर काही रक्कम कमी पडत असल्याने त्यांनी रिक्षा चालक सुनील जगदाळे यास रिक्षातून रक्कम आणण्यास सांगितले. जगदाळे हा रिक्षाजवळ आल्यानंतर त्याला स्पीकर बॉक्स तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्याने आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिक रिक्षाजवळ जमा झाले. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोन्ही चोरटे मध्यप्रदेश येथील असल्याचे आढळून आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या आयुष्याची कमाई चोरट्यांनी लंपास केल्याचे पाहून लताबाई लिंगायत यांनी हंबरडा फोडला. मी आयुष्यभर आरोग्य सेविका म्हणून काम केले. घरदार सोडून इतर ठिकाणी नोकरी केली. मला पती नाही, त्यांचे निधन झाले आहे. एकुलता एक मुलगा होता, त्याचेही दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे. माझ्या आयुष्याची कमाई गेली, असे म्हणत त्या रडत होत्या. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढून आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले.