मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे निष्ठावंत नेते, ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ‘बंडाळी’मुळे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे एकनाथ शिंदे पक्षावर, नेतृत्वावर नाराज का झाले, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ते का नाराज आहेत याबाबतची काही माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांचे पुत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा चार्ज घेतला. शिवाय प्रत्येक निर्णय प्रक्रियेत आदित्य ठाकरे वाढता हस्तक्षेप हे शिंदेच्या नाराजीचं प्रमुख कारण माणलं जात आहे. तसंच युवासेनचे वरुण सरदेसाई यांचा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यावरती हस्तक्षेप वाढत असल्यामुळे शिंदे यांच्या मनात याबाबत खदखद होती अशी माहितीसमोर येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापण झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक शिवसेना आमदारांना निधी नाकारला. त्याऐवजी त्याच्या विरोधातील राष्ट्रवादी नेत्यांना त्यांनी निधी दिला. शिवाय निधी वाटपावरुन अनेक शिवसेना आमदारांनी याआधी देखील पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली होती. मात्र त्यावरती काही तोडगा काढण्यात आला नव्हता त्यामुळे शिवसेना आमदारांची नाराजी वाढत गेली.