चोपडा (प्रतिनिधी) जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी दि.१० ऑक्टोबर (मंगळवार) पासून सकाळी ११ वाजेपासून मागण्या मान्य होईपर्यंत जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.) व जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर (मुक्ताईनगर) हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत.
जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळण्यासाठी सर्वच प्रांत कार्यालयांकडे हजारों प्रकरणे प्रलंबित आहेत. हे दाखले कोळी नोंदीनुसार सुलभ पद्धतीने मिळावेत व त्यांची वेळीच वैधता व्हावी, यासह इतरही मागण्यांसाठी जिल्हा आदिवासी कोळी जमातीतर्फे चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.) व आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर (मुक्ताईनगर) हे दि.१० ऑक्टोबर २०२३ (वार-मंगळवार) रोजी स.११ वाजेपासून मागण्या मान्य होईपर्यंत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत.
या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय कोळी समाजाचे नेतेमंडळी, सर्वच कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, आजीमाजी अधिकारी, कर्मचारी तसेच हज्जारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. याआधी हे दाखले दिले जायचे, मग आता का देत नाहित ? हा प्रश्नही ऐरणीवर आहे. घटनादत्त अधिकारानुसार महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय व कोर्टाचे आदेश असताना सुद्धा संबंधित विभागामार्फत कोळी लोकांना अनुसूचित जमातीच्या दाखल्यांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे. यावेळी धरणे आंदोलन, जेलभरो आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन पर्यायाने आत्मदहनही करणार येईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील. कायदा शांतता सुव्यवस्था राखून हे काम करीत असतांना संबंधित विभागाने सहकार्य करावे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
याबाबत चोपडा येथे समाजसेवक लखिचंद बाविस्कर यांचे निवासस्थानी बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक भाईदास कोळी यांनी केले. कोळी समाजाचे नेते प्रभाकर सोनवणे यावल, जितेंद्र सपकाळे भुसावल, प्रल्हाद सोनवणे जळगाव यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन पंकजकुमार रायसिंग व आभार प्रदर्शन भास्कर कोळीसर यांनी केले. यावेळी चोपडा तालुक्यातील कोळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.