यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळन्हावी येथे घराबाहेर अंगणात खाटेवर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी लांबवली होती. ही घटना 20 जुन 2023 रोजी घडल्यांनतर यावल पोलिसांनी भुसावळातील दोघांना अटक केली आहे. आरोपीकडून चोरी केलेली पोत जप्त करण्यात आली.
कोळन्हावी येथील लिलाबाई बुधा साळुंखे (70) ही वृद्धा 20 जून 2023 रोजी घराचे बांधकाम सुरू असल्याने घराबाहेर अंगणात झोपली असताना पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी वृध्द महिलेच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरीने तोडून पळ काढला. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार वासुदेव मराठे यांनी या गुन्ह्याचा तपास करीत अब्बास इबाबत अली इराणी (20) व सखी मोहंमद खान इराणी (34, पापा नगर, रजा टॉवर जवळ, भुसावळ) या दोघांना अटक केली.
संशयताना मंगळवार, 22 ऑगस्ट रोजी यावल न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांनी 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली व या पोलीस कोठडीत या दोघांनी चोरी केलेली सोन्याची पोत काढून दिली. चोरट्यांना गुरूवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.