चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी महाविद्यालयात क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील सर्वच शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळेतील ६८१ कर्मचाऱ्यांना सदर क्षमता चाचणी द्यावयाची होती परंतु सर्वच कर्मचाऱ्यांनी क्षमता चाचणी परीक्षेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे यांनी दिलेल्या पत्रकानुसार दिनांक १७ रविवार रोजी सर्वच प्रकल्पांनी शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन केले होते. या क्षमता चाचणी परीक्षेसाठी उपस्थितीचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले होते.परंतु या अगोदरच प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चाचणी परीक्षेवर बहिष्कार असल्याचे आणि तो यशस्वी केल्याचे प्रतिक्रिया आदिवासी विकास विभाग अनुदान कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, आमच्या विविध मागण्या आहेत.यात शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे ११ ते ५ करावी,जुनी पेन्शन योजना लागू करावी. दहावी बारावी निकाला संदर्भात अन्यायकारक परिपत्रके मागे घेणे तसेच इतर प्रलंबित मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोवर असाच प्रकारच्या बहिष्कार कायम असल्याची भावना आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.