भुसावळ (प्रतिनिधी) तुमच्या मुलाला क्राईम ब्रँच’मध्ये नोकरी लावून देते, असे आमिष दाखवून भुसावळ येथील निवृत्त शिक्षकाला तब्बल ८ लाखांत गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक येथील माय-लेकीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
येथील निवृत शिक्षक शशिकांत रघुनाथ मेढे (वय ६२, रा. फालक नगर, वैष्णवीदेवी मंदिरामागे, भुसावळ) यांचा मुलगा सुमीत मेढे याला नाशिक येथे कॉईम ब्रँच’मध्ये नोकरी लावून देते, असे आमिष दाखवून संशयित कल्पना संजय सोनवणे व साक्षी संजय सोनवणे (दोन्ही रा. राजनार्दन स्वामी नगर, दसक, जेल रोड, नाशिक) या मायलेकीने मेढे यांच्याकडून २८ डिसेंबर २०२२ ते २३ मार्च २०२३ या काळात वेळोवेळी ८ लाख रूपये उकळले. मात्र, पैसे देऊनही मुलगा सुमीत याला नोकरी लागत नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यवर शशिकांत मेढे यांनी कल्पना सोनवणे यांच्याकडे ८ लाख रुपये परत मागण्यास सुरुवात केली.
परंतू संबंधित महिलेने पैशांसाठी वारंवार फोन करू नका. अन्यथा मी आत्महत्या करेल आणि तुमचे नाव घेत फसवून टाकील, अशी धमकी दिली. यामुळे मेढे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत कल्पना सोनवणे व साक्षी सोनवणे यांच्याविरूद्ध गुन्हा केला असून पुढील तपास हवालदार विजय नेरकर हे करीत आहेत.