धरणगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “माझी वसुंधरा” या अभियानांतर्गत धरणगाव शहरात नगरपरिषद व विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जानेवारी २०२१ रोजी शहरात “पर्यावरण जनजागृती सायकल रॅली” (धरणगाव फर्स्ट) हा उपक्रम राबवून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत अभियानाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणाची जी पंचतत्वे आहेत ज्यात “पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश यांचे संरक्षण करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, तसेच नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देणे, हा या जनजागृती रॅलीचा मुख्य उद्देश आहे. नववर्षाची सुरुवात पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प करून या उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन धरणगाव नगरपरिषद व विकल्प ऑर्गनायझेशन यांच्या तर्फे करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्ती ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी करू शकता अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दिली आहे.
पर्यावरण वाचले तरच मनुष्य वाचेल या गोष्टीला अनुसरून धरणगाव शहरातील १४ वर्ष व त्यावरील वयाच्या जास्तीत जास्त मुले-मुली, महिला – पुरुष यांनी सहभाग नोंदवून सदर अभियान अंतर्गत ‘धरणगाव फर्स्ट’ करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन धरणगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व विकल्प ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष रविंद्र मराठे यांनी केले आहे.
















