जळगाव (प्रतिनिधी) पिस्तूलचा धाक दाखवत कारागृहातून पळुन गेलेला बडतर्फ पोलिस कर्मचारी सुनील मगरे (वय ३२, रा. लेलेनगर, पहुर, ता. जामनेर) याला पहुर पोलिसांनी राहत्या घरातून तब्बल चार महिन्यानंतर अटक केली आहे. मगरेकडून पोलिसांनी एक पिस्तूल, सुरा पोलिसांनी जप्त केला आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मंुढे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भात अधिक असे की, २५ जूलै २०२० रोजी कारागृह रक्षक पंडीत गुंडाळे यांच्या कपाळावर पिस्तूल रोखुन, मारहाण करीत तीन कैदी पळुन गेले होते. मगरे याच्यासोबत गौरव पाटील व सागर पाटील हे देखील पळुन गेले होते. कालांतराने गौरव व सागर पाटील यांना तसेच या तीघांना वेगवेगळया प्रकारे मदत करणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मगरे हा अटक होणारा अकरावा आरोपी आहे. मगरे हा बडतर्फ पोलिस कर्मचारी असल्यामुळे तो मागील चार महिण्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी पहुरमध्ये खबरी तयार करुन ठेवले होते. दरम्यान, रविवारी पहाटे चार वाजता सुनील मगरे हा पहुर येथील घरी आल्याबरोबर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याशी संपर्क करुन सापळा रचला. त्यानुसार मगरेला आज सकाळी ८ वाजता खताळ हे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल देवढे, उपनिरीक्षक संदीप चेढे, भरत लिंगायत, ज्ञानेश्वर ढाकरे, अनिल राठोड, इश्वर देशमुख यांच्यासह मगरेच्या घरी पोहोचले. पोलीस आल्याचे लक्षात येताच मगरे खोलीत जाऊन मागच्या बाजुने उडी मारुन दुचाकीने पळुन जाण्याच्या प्रयत्नात होता. तत्पूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.