धरणगाव (प्रतिनिधी) येथे नुकतीच ओजस्विनी महिला मंडळाची स्थापना झाली. महिलादिनाचे औचित्य साधून मंडळाने दिगंबर जैन मंदिरात महिलांसाठी आनंद मेळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शहरातील सर्व समाजाच्या व सर्व स्तरातील महिलांनी सहभाग नोंदविला आणि कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. नंतर सर्व भगिनींनी साने गुरुजींची “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना गाऊन आनंद मेळ्याची सुरुवात झाली. सर्व समाजातील आणि सर्व स्तरातील महिलांना एकत्र आणणे, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविणे, त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे, गरीब स्तरातील विद्यार्थी आणि महिलांसाठी मदतीचा हात पुढे करणे असे या ओजस्विनी महिला मंडळाचे प्रमुख उद्देश आहेत.
याचाच प्रमुख भाग म्हणून आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक बचत गटांच्या, अनेक गरजू महिलांनी विविध खाद्य पदार्थांचे तसेच साड्या, कपडे सौंदर्य प्रसाधने, पर्यावरणपूरक शिवलेल्या पिशव्या आदींचे स्टॉल लावले. या आनंद मेळ्यामध्ये फक्त धरणगावातीलच नव्हे तर मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील भगिनीसुद्धा सहभागी झाल्या होत्या.